नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे

नागपूर : मनपाकडून लसीकरणासाठी विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. मात्र, यानंतरही नागरिकांकडून काहीतरी कारण देत लस घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महानगरपालीकेच्या लसीकरण केंद्रांवर पहिल्या डोजची मोफत सेवा बंद केली जाणार असून ३० नोव्हेंबरनंतर नागरिकांना पहिल्या डोसासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.नागपूर शहरात १८ वर्षांवरील लसपात्र नागरिकांची संख्या १९ लाख ८३ हजार आहे. आतापर्यंत पहिला डोस १६ लाख ८७ हजार ८६५ जणांनी घेतला आहे, तर दुसरा डोस ९ लाख ३४ हजार ४७४ जणांनी घेतला आहे. पहिला डोस घेऊन निर्धारित कालावधी संपला, तरी दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. यामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे.नागपुरात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ७ लाख ४४ हजार ३९१ आहे. मागील दोन आठवड्यांत दुसरा डोस घेणाऱ्यांची अपेक्षित वाढ झालेली नाही. दुसरीकडे नागपूर शहरातील दोन लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झालेले नाही. या लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बैठका, जनजागृती, शिबिरांचे आयोजन, धर्मगुरू, विविध राजकीय पक्षांचे नेते यांची मदत घेतली जात आहे.

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीचा किमान पहिला डोस पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे डिसेंबरपासून लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना खर्च करावा लागणार आहे. यामुळे ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला नसेल, त्यांनी तत्काळ घ्यावा. असे आवाहन मनपाने केले आहे. नोव्हेंबरनंतर शासकीय केंद्रांवर केवळ दुसरा डोसच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

घरोघरी जावून लस देणार.

शहरात अजूनही ज्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. घरोघरी जावून लस देण्याचा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांमध्ये १०० टक्के लसीकरण होण्याची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *